अतुल देशपांडे
सातारा (हवेलीनामा वृतसमूह) भाजपमधून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले अमोल मोहिते यांना सातारकरांनी विक्रमी मताधिक्य देऊन निवडून आणून साताऱ्याच्या प्रथम नागरिक पदी बसवले खरे मात्र अमोल मोहिते यांनी निवडणुकीदरम्यान प्रचार करत असताना गट तट न ठेवता साताऱ्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
साताऱ्याची निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. दोन्ही राजेंचे मनोमिलन झाल्याने अनेक जणांना तिकीट वाटपात डावलले गेले होते. त्यामुळे दोन्ही गटातून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. याचा परिणाम होऊन भाजपचे अनेक दिग्गज शिलेदार पराभूत झाले. परंतु बंडखोरी केलेल्या अपक्ष नगरसेवकांनी दोन्ही राजेंची भेट घेत भाजपला पाठिंबा दर्शवला. यामुळे नगरपालिकेत आता निवडून आलेल्या नगराध्यक्षांना कामकाज करताना कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही भाजपच्या विरोधात रान उठवले होते. त्यांना निवडणुकीत यश आले नसले तरी, त्यांच्याकडून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. यावेळी प्रचारात साताऱ्यातील अनेक प्रश्नांवर उवापोह झाला. साताऱ्यातील खड्डे,अतिक्रमणे,बंदिस्त गटार योजना, पाण्याचा प्रश्न,आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, धुळीचे साम्राज्य, नगरपालिकेच्या शाळांची झालेली दुरावस्था, समाज मंदिराची दुरावस्था अशा एक न अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना अमोल मोहिते यांनी सातारकरांनी निवडून दिल्यास नागरिकांना सोबत घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही दिली होती. सातारकरांनी त्यांचा शांत स्वभाव आणि काम करण्याची वृत्ती पाहून त्यांना भरभरून मतदान करत विक्रमी मताधिक्याने निवडून दिले. त्यामुळे अमोल अमोल मोहिते यांची जबाबदारी वाढली असून सातारकरांना दिलेला शब्द त्यांना खरा करून दाखवावा लागेल.
