किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : थकीत वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा प्रकार खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे घडला. महावितरण कर्मचारी मारहाण प्रकरणी संशयीत संदीप बाळासाहेब सरडे व रामदास बाळासाहेब सरडे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस शिपाई भीमा लांडे यांनी दिली. वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंकुश बोऱ्हाडे (रा. जऊळके) यांनी याप्रकरणी खेड पोलिसांत तक्रार दिली.
संशयीत व्यक्तीच्या मृत आजोबा विठोबा तुकाराम सरडे यांच्या नावे गाडकवाडी येथे घरगुती वापराचा वीजमीटर आहे. त्याचे नऊ महिन्यांचे १८९६ रुपयांचे थकीत बिल सुमारे नऊ महीन्यांपासून भरले नव्हते. वरिष्ठांच्या आदेशानुसार, तक्रारदार बोऱ्हाडे व इतर चार कर्मचारी मंगळवारी दुपारी गाडकवाडी येथे त्यांच्या घरी गेले. त्यांनी वीजबिल तत्काळ भरण्याची मागणी केली. त्यावर आम्ही नंतर भरू असे सांगितले.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून पुरवठा खंडित केला. त्याचा राग अनावर झाल्याने दोन भाऊ व इतरांनी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर अडवून मारहाण व शिवीगाळ केली.
