थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) कोलवडी परिसरात स्टार सिटी सोसायटी वस्ती, मांजरी कोलवडी शिवरस्ता या ठिकाणी असलेली सुमारे २५ ते ३० घरे आठवड्यातून दोन ते तीन दिवस अंधारात असतात. महावितरणच्या कारभाराने येथे राहणारे स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रोहित्राची क्षमता कमी अन त्यावर असलेल्या वीजजोडांचा वापर वा मागणी जास्त आहे.तीन फेज पैकी सातत्याने कोणताही एक फेज बंद पडण्याने येथील रहिवाशी खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. त्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होत नाही, त्यांच्या तक्रारीची दखल वेळेत घेतली जात नाही.

वायरमनशी संपर्क केला तर त्यांनी सांगितले की, सध्या थकबाकी वसुलीचीच कामे सांगितली आहेत, दुरुस्तीकडे लक्ष द्यायचे नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने तुमच्या तक्रारीची वेळेवर दखल घेऊ शकत नाही. शिवाय थेऊर येथील महावितरण शाखेला गेल्या सहा महिन्यापासून अधिकारी नसल्याने, कुंजीरवाडीचे सहाय्यक इंजिनियर अलदार यांच्याकडे थेऊरचा अतिरिक्त भार आहे त्यांचेही या भागातील समस्यांकडे म्हणावे असे लक्ष नाही. त्यामुळे थेऊर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांचे वीज पुरवठ्याबाबतीत दुर्लक्ष होत असल्याने येथील गावांची अक्षरशः पराकोटीची गैरसोय होत असताना देखील याकडे महावितरणचे दुर्लक्ष होण्याने जनता त्रस्त झाली आहे.
विशेष बाब म्हणजे या भागात सध्या ऊसतोड सुरू असून, ऊसतोडणी मजूर झोपड्या बांधून राहावयास आहेत. ते लोक आकडा टाकून सर्रास वीज जोड घेऊन वीजेचा वापर करत आहेत. मात्र, जे रहिवासी रितसर वीजजोड घेऊन विजेचा वापर करतात , त्यांना वीज उपलब्ध होत नाही. रोहित्राची क्षमता कमी असल्याने सतत फ्यूज उडत असतो. रात्री अपरात्री कधीही वीज जात असते. त्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. शेतीचा परिसर असल्याने साप विंचूचा उपद्रव भेडसावत असतो. यासंबंधी वीज कर्मचाऱ्यांना कळवूनही दखल घेतली जात नाही. वरिष्ठांना कळवले तर मोगम उत्तर देऊन टाळाटाळ करत असतात. अशाने येथील रहिवासी हतबल झाले आहेत. याची दखल वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व रहिवाशांना आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर नाही , असे रहिवासी व्यक्त करत आहेत.

गेले दोन दिवस रात्री या भागास वीज पुरवठा होत नाही..मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांना आकडा टाकून वीज पुरवठा होत आहे. तीन फेज पैकी एक फ्यूज उडाला की ते लोक दुसऱ्या तारेवर आकडा टाकून वीज घेत असतात. मात्र रितसर विज जोड असून देखील वीज पुरवठा होत नाही.
