थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथील नायगाव चौक आणि कुंजीरवाडी मुख्य चौकातील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या वाहतूक विभागाला सतावत असून यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. नायगाव चौकात येणाऱ्या आळंदी म्हातोबा आणि नायगावच्या नागरिकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन येथे गोलाकार वाहतुकीची सोय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावी अशा अशयाचे पत्र वाहतूक विभागाने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांना दिले आहे.
वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या नायगाव चौकात अनेक अपघात घडले आहेत तर रुग्णवाहीका अडकून पडताना दिसतात. अशी परिस्थिती उरुळी कांचन येथील तळवाडी चौक आणि एलाईट चौकात कायम वाहतूक कोंडी होत असल्याने ग्रामीण पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मदतीने गोलाकार वाहतुकीचा प्रस्ताव तयार करून तो अमलात आणला त्यामुळे चौकामध्ये मुख्य रस्त्यावर येणारी वाहने डाव्या बाजूने मुख्य मार्गाला लागून पुढे काही अंतरावरून त्यांनी वळण घेण्याची व्यवस्था केली त्यामुळे चौकामध्ये वाहने आडवी न येता वाहतूक सरळ झाली परिणामी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली हाच प्रयोग कुंजीरवाडी येथील नायगाव चौक तसेच कुंजीरवाडी गाव या ठिकाणी करण्याचा पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाकडून करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे यासाठी कुंजीरवाडी गाव तसेच आळंदी म्हातोबा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्याकडून यासंबंधीचे पत्र वाहतूक विभागाकडे आल्यानंतर त्या अनुषंगाने वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांच्याकडे त्याविषयीचे पत्र दिले आहे यावर या विभागाकडून लवकरात लवकर याची अंमलबजावणी व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे यामुळे गावातील वाहतूक कोंडी कमी होऊन बाजारपेठेला चांगला वाव मिळेल अशी स्थानिक व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.

याविषयी कुंजीरवाडी चे माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश (बापू) घुले यांनी सांगितले की, कुंजीरवाडी ते नायगाव चौकामध्ये कायमच वाहतुकीची समस्या निर्माण होते आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना याचा फार मोठा त्रास होतो त्यामुळे पुणे शहर वाहतूक विभागाकडून उरुळी कांचन येथील वाहतूक नियमनानुसार येथे वर्तुळाकार वाहतूक व्यवस्था केली तर वाहतूक समस्या सुटून महामार्गावर कोंडी होणार नाही असे त्यांनी सांगितले.
