किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : वाफगाव (ता.खेड) परिसरातील शेतकरी व पाणी वाटप संस्थेचे संचालक यांनी येथील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बुधवारी ( दि.१० ) धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी वाफगाव लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याचे आदेश दिले असतानाही कार्यकारी अभियंता, उपअभियंता व चासकमान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नाईलाजाने हे धरणे आंदोलन केले असल्याचे वाफगावचे माजी उपसरपंच अजय भागवत यांनी सांगितले. ‘ पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं ‘ , ‘ अनधिकृत पाणी उपसा बंद करा, नाहीतर खुर्च खाली करा. अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष थिटे, माजी सरपंच शरद थिटे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे, विविध कार्यकारी सोसायटी संचालक भरत थिटे, माजी संचालक रज्जाक इनामदार, माजी उपसरपंच विकास कराळे, मोहन मांदळे, खंडू शिंदे, काळूराम मांदळे, कैलास कराळे, नंदू चिखले, शांताराम रामाणे, श्रीरंग सुर्वे, संपत कराळे,अमित लंगोटे, अंकुश कानपिळे, सचिन कालेकर व शेतकरी उपस्थित होते.

अनधिकृत पाणी उपसा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात तलावात पाणी शिल्लक राहत नाही, त्यामुळे वाफगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते. दरम्यान, याबाबत सहाय्यक अभियंता संतोष शिंदे यांनी येत्या १५ डिसेंबरला अनधिकृत मोटारीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कारवाईत महावितरण विभाग व पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी एका पेक्षा जास्त मोटारी असलेल्या शेतकऱ्यांचे पाणी वापरण्याचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
