पुणे (हवेलीनामा वृतसमूह) माझे मूळ गाव करमाळा जिल्हा सोलापूर त्याकाळी करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून किंबहुना सर्व सोलापूर जिल्हाच दुष्काळी पट्टा म्हणून प्रसिद्ध होता. पाऊस कधीतरी पडायचा. त्यामुळे आमच्या गावातील आणि आजुबाजूच्या गावातील तसेच करमाळा तालुक्यातील आसपासच्या सर्वच गावातील लोकांचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते आणि त्यामध्ये आमच्या कुटुंबाचा ही समावेश होता.

1984 साली माझ्या वडिलांनी आमच्या कुटुंबासह पुण्यात स्थलांतर केले .वडील अशिक्षित, अंगठे बहादुर असल्यामुळे त्यांना दुसरे काम मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी गावाकडील इतर लोकांप्रमाणे गुलटेकडी ,मार्केट यार्ड* मध्ये धान्य बाजारात हमाली चे काम सुरू केले. हमाली हा आमचा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या वंश परंपरागत व्यवसाय. माझे वडील ,भाऊ,काका ,चुलते ,मामा आणि जवळ पास सर्वच जवळचे आणि दूरचे नातेवाईक गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे या ठिकाणी हमाली करायचं.

आणि आम्ही सर्वजण राहायला माळवाडी, हडपसर, पुणे या ठिकाणी. आमच्या आसपास सर्वच हमाल राहत होते .एक तर आम्हाला दुसरीकडे कोणी खोल्या, घर भाड्याने देत नसत कारण आमच्या परिसरा मध्ये त्या काळी एक समज होता की हमालांच्या मुलांना वळण नसतात आणि त्यांच्यामुळे आमची मुले बिघडतील. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी भाड्याने ही घरे मिळत नसत आणि आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी इतर चांगले लोक राहायला येत नसत .

त्याकाळी हमाली करणे हे खूप कष्टाचे आणि मेहनतीचे काम होते. माझे वडील ज्यावेळेस हमाली करायचे त्यावेळेस शंभर किलोची पोती होती आणि ती पाठीवर वाहावी लागत . एवढे ओझे सतत पाठीवर वाहिल्यामुळे जवळ जवळ सर्व हमालांची पाठ काळी पडलेली असे. मला शिक्षणामध्ये आवड नव्हती. कुस्ती खेळण्याचे वेड होते. मला शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी . परिस्थिती ची जाणीव व्हावी. म्हणून माझ्या आईने 1988 साली ज्यावेळेस माझी इयत्ता सातवीची वार्षिक परीक्षा झालेली होती त्यावेळेस एप्रिल – मे च्या कालावधीत दोन महिने मला वडिलांबरोबर हमाली करण्यासाठी पाठवले होते. एप्रिल – मे च्या कालावधीत कडक उन्हाळा असतो. उन्हामध्ये हमालाना पायात चप्पल न घालता शंभर – शंभर किलोची धान्याची पोती उचलावी लागायची. रोडवरती डांबर पगाळलेल असायचं आणि ते डांबर पायाला चिटकत असे आणि गरम डांबराचे चटके पायाला बसूत . धान्य खाली पडल्यामुळे त्यावरती पाय सटकू नये. घसरू नये म्हणून सर्वच हमाल चप्पल घालत नसत . वडिलांचे हमालीचे काम एवढे कष्टाचे होते की तेथील भयानक परिस्थिती पाहून मी पुन्हा शिक्षणाकडे वळालो.

डॉ बाबा आढावांनी हमाला साठी हमाल पंचायत उभी केली. त्यांनीहमालांची संघटना बांधली. त्यांना लढायला शिकवले. त्यांच्या लढ्याला हळूहळू यश येऊ लागले. 100 किलो ची जी पोती पाठीवरती उचलावे लागत होती ती हळूहळू कमी वजनाची झाली .तसेच हमालीचा दरही हळूहळू वाढू लागला. हमालाना काम सोडल्यानंतर रिटायरमेंट फंड सुद्धा भेटू लागला.त्यामुळे हमालांना म्हातारपणी थोडासा आधार मिळू लागला.

एवढेच नाही तर बाबांनी हमालाना संघर्ष कसा करायचा. एकीने कसं राहायचं. सर्वांनी मिळून बरोबर कसे पुढे जायचं हे ही शिकवले आणि हा संघर्ष करीत असताना आपण ज्याच्याशी संघर्ष करीत आहोत म्हणजे हमालांचा संघर्ष हा व्यापारी वर्गाशी आणि शासनाशी होता. या संघर्षात त्या दोघांचीही नुकसान होणार नाही आणि आपल्याही मागण्या मान्य होतील या दोन्ही गोष्टींची काळजी डॉ बाबा आढावांनी घेतली.

आज गुलटेकडी मार्केट मध्ये हमाली जरी कष्टाचं काम असलं तरी त्याला एक प्रतिष्ठा आहे आणि ते काम करणारी लोकं स्वाभिमानी आहेत. ते उगाच कोणाच्या पुढे पुढे करत नाहीत. काहीतरी फुकट भेटेल म्हणून कुठे लाईन लावत नाहीत. कष्टाचे काम करतात आणि स्वाभिमानाने जगतात आणि हा स्वाभिमान डॉ बाबा आढावांनी हमालना शिकवला.

बाबा आपल्या हमालांना नेहमी सांगत की तुम्ही जे काम करताय ते खूप कष्टाची आहे . याचा अर्थ असा नाही की पुढच्या पिढीने हेच काम केले पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा आणि फक्त शिकू नका तर त्यांचवरती संस्कार ही घडवा. त्यांना एक माणूस म्हणून घडवा की जो इतर माणसांसी, माणसासारखे व्यवहार करेल. इतर माणसांसी माणसासारखे वागेल.

1991 ला ज्यावेळेस माझी दहावी झाली आणि मला चांगले मार्क्स मिळाले. त्यावेळी डॉ बाबा आढाव त्यांच्या सहकार्यासह आम्ही राहत असलेल्या झोपडीमध्ये माझा सत्कार करण्यासाठी आलेली होते. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी सर्वच हमाल राहत असल्यामुळे, आमच्या घरी डॉ बाबा आढाव आल्यानंतर आमच्या परिसरात एखाद्या देवदूताची भेट झाल्याचे सारखे वातावरण तयार झाले. माझे वडील , भाऊ, तसेच सर्व नातेवाईक आणि आसपासची परिसरातील लोक गुलटेकडी ,मार्केट यार्ड मध्ये हमालीचे काम करत असल्यामुळे लहानपणापासून असा एकही दिवस जात नव्हता की ज्या दिवशी डॉ बाबा आढाव यांचे नाव कानावर पडत नव्हते. एवढे हमालांचे डॉ बाबा आढाव यांच्या वरती प्रेम होते आणि बाबांचे हमालांवरती प्रेम होते. बाबांना हे सर्व हमाल आपल्या स्वतःच्या लेकरांसारखे वाटत होते .

3 जानेवारी 2012 ला ज्यावेळेस आम्ही बेटी बचाव जन आंदोलनाची सुरवात आमच्या छोट्याशा मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये केली त्यावेळेस बाबांना हे समजल्यानंतर बाबांना एवढा आनंद झाला की त्यांनी हमालपंचायत च्या वतीने माझा सत्कार ठेवला आणि सत्कार झाल्यानंतर म्हणाले की या सत्काराने भारावून जायचे नाही. तुला खूप मोठी लढाई पुढे भविष्यात लढायचे आहे.

त्यानंतरही अनेक वेळा बाबांनी आमच्या मेडिकेअर हॉस्पिटल ला भेट दिली. अधून मधून फोन करायचे किंवा भेटायला ही बोलवायचे किंवा मी स्वतःही त्यांना भेटायला जायचो आणि बेटी बचाव जन आंदोलनाच्या चळवळीविषयी माहिती द्यायचो. ते ही वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. आमच्याकडून माहिती घ्यायचे .

बाबांचे आणि सर्वच हमालांचे आणि माझे पहिल्यापासूनच खूप जिव्हाळ्याचे संबंध, नाते आहे. हमाली हा शब्द माझ्यासाठी खूप भावनिक आहे. किंबहुना आजही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माझी ओळख *एक कुली का बेटा … डॉ गणेश राख … अशीच आहे. आजही माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंट मध्ये बहुसंख्य पेशंट्स हे हमालच असतात. त्यांना आमचे मेडिकेअर हॉस्पिटल हे त्यांची स्वतः चे , हक्काचे हॉस्पिटल असल्यासारखे वाटते आणि मी त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखा वाढतो. त्यामुळे त्यांनाही माझ्याविषयी खूप प्रेम वाटते, आपुलकी वाटते की हा आपल्या हमालाचा मुलगा आहे म्हणून … आणि मलाही माझ्या वडिलांबरोबर काम करणारे वडिलांचे हे सर्व सहकारी आहेत म्हणून त्यांच्या विषयी खूप आदर वाटतो.

डॉ बाबा आढाव यांच्यामुळे खूप लोकांचे आयुष्य बदलून गेले.डॉ बाबा आढाव यांच्यामुळे एक संस्कार असणारी, संस्कारक्षम अशी पिढी तयार झाली की जे बाबांचे विचार घेऊन चालणारे, कष्ट करणारे ,घाम गाळणारे पण स्वाभिमानाने जगणारे.

आज बाबा आपल्यात नाहीत. अशा थोर कामगार नेत्यास मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *