किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : राज्यात लाडकी बहीण योजनेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असतानाही विधानसभा निवडणुकीत खेड-आळंदी मतदारसंघातील भगीनींनी मात्र माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून देऊन इतिहास घडविला. माझ्या विजयात वारकरी सांप्रदायातील नागरीकांसह भगीनींचा फार मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी येथे केले.

येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या ४६ व्या अखंड हरीनाम सप्ताहास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर ह.भ.प. दत्ता महाराज भोर (संगमनेर), राजगुरुनगर बँकेचे संचालक अविनाश कहाणे, युवा सेनेचे संतोष राक्षे, मंडळाचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, विलास कहाणे, विठ्ठल सांडभोर, जी. र.शिंदे, अनिल कहाणे, बाळासाहेब दौंडकर, अनिल लांडगे, नामदेव कहाणे, मच्छिंद्र भालेकर, लक्ष्मण रेटवडे, विजय भालेकर, सुदाम वेहेळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले, राज्याच्या विधानसभेत गेल्यावर मला सर्वजण खेड-आळंदीचे, वारकऱ्यांचे आमदार म्हणून ओळखतात. हि ओळख मला माऊलींनी, आपल्या तालुक्याने व वारकऱ्यांनी मिळऊन दिली. वारकऱ्यांच्या कामासाठी मी सदैव तत्पर आहे. तालुक्यातील भगीनींनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होऊनही मतांचं भरभरून दान मात्र मला दिलं. मी त्यांचा ऋणी आहे. या सर्वांच्या सहकार्याने एका लहानशा वाडीतला मी आमदार होऊ शकलो.

पुढे बोलताना, राजगुरुनगरचा सप्ताह हा तालुक्याचा सप्ताह म्हणून नावाजलेला आहे. चांगले कार्यकर्ते आहेत. भावी काळात किर्तनासाठी प्रशस्त सभामंडप बनविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खुडे यांनी केले. आभार नामदेव कहाणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *