इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी) इंदापूर तालुक्यात सध्या शासकीय कार्यालयामधील कारभारा बाबत जनतेत प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.अनेक विभागांमध्ये अधिकारी पाच ते सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पर्यंत एकाच ठिकाणी शासकीय पदावर काम करत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांना स्थानिक राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याच्या देखील चर्चेला उधाण आले आहे.
शासकीय अधिकाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्याने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांची कामे अक्षरशः ठप्प पडली असून वेळेत काम करणे तर दूरच पण शासकीय अधिकारी वेळेत शासकीय कार्यालयात उपस्थित पण राहात नाहीत.शासकीय महत्वाच्या कागदावर, उताऱ्यावर, विविध दाखल्यावर सह्या करायच्या म्हटलं तर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांच्या सह्या आणतात. राजकीय वरदहस्त असल्याने शासनाच्या विविध विकास कामांच्या निधीच्या बिलामध्ये देखील मोठ्या तफावती दिसून येतात. इंदापूर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात महत्त्वाच्या विभागात काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करत असल्याचे दिसून येत.
या राजकीय वरदहस्तामुळे गोरगरिबांची कामे वेळेत मार्गी लागली जात नाहीत.संबंधित पक्षाच्या जवळच्या कार्यकर्त्यांची कामे मात्र वेळेत केली जातात.सर्वसामान्यांचे कामे वेळेवर होत नाहीत. शासकीय प्रमाणपत्रे, दाखले, विविध प्रकरणे, महिनो महिने शासकीय कार्यालयातील टेबलावर धुळखात पडतात.
लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक विविध शासकीय योजनेच्या अनुदाना पासून ठेवले जाते. शासकीय कार्यालयात गोरगरीब, वृद्ध नागरिक, महिला आणि शेतकऱ्यांना सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारून देखील ग्रामस्थांचे कामे होत नाहीत.
शासकीय अधिकारी दौऱ्यावर असून शासकीय कामा निमित्ताने बाहेर गेले आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे शासकीय कार्यालयातील निम-शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने दिली जातात. शासकीय कार्यालयात काही अधिकारी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आला आहे किवा कोणत्या नेत्याशी संबंधित आहे यावरूनच त्याची कामे करण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय घेतात.असे ग्रामस्थातून खाजगीत बोलले जात आहे.
इंदापूर तालुक्यातील ही बेजबाबदार शासकीय कार्यपद्धती थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून एकाच पदावर वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करून बदली करावी राजकीय हस्तक्षेपाला आळा घालणे काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या मधून येत आहेत.
