किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : मतदारांना आर्थिक प्रलोभन देत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा आरोप व याप्रकरणी राजगुरूनगरचे माजी नगराध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह सात जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रीकरण झाले आहे.

शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले शिवाजी मांदळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक पदासाठी आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. फिर्यादी साई विलास पिंगळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

शिवाजी मांदळे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी दोन तरुणांना “मतदारांना पैशाची बॅग वाटताना पळून का गेला?” अशा संशयातून बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना मांदळे म्हणाले, संबंधीत तरुण मतदारांना पैसे वाटप करताना आढळुन आले. कार्यकर्त्यांनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला असता ते पळून चालले होते. कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांना रोखण्याचा मी प्रयत्न केला. तक्रारीत फिर्यादींनी जमीन पाहायला आल्याचे म्हटले आहे. पोलीस सखोल चौकशी करून न्याय देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *