थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवी काकडे यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन येथील पेशवेवाडा येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये 1770 हून अधिक नागरिकांनी सहभागी झाले.
या महाआरोग्य शिबिरात हृदयविकार तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच हात-पायांच्या कृत्रिम अवयवांसाठी नोंदणीची सुविधाही उपलब्ध होती.
१२६० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ८२० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ३८ रुग्णांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले असून या सर्वांवर पुढील काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 3 नागरिकांना कृत्रिम हात व पाय मोफत देण्याची नोंदणी करण्यात आली.
या उपक्रमामुळे थेऊर परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या असून, शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आरोग्यदूत युवराज काकडे व पल्लवी काकडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

