राजगुरूनगर : (हवेलीनामा वृतसमूह) : येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठीच्या ४० उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे. आता राजगुरूनगर नगरपरिषदेच्या १८ जागांसाठी ५८, आणि नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. २१ जागांपैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी १६८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी चार अर्ज छाननीत बाद झाले होते. ४० जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. आता ५८ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज माघारी घेण्यात आला. त्यामुळे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग क्र. १ मध्ये किशोर थिगळे, प्रभाग क्र. ३ मध्ये अनिरुद्ध सांडभोर, प्रभाग क्र. १० मध्ये सुप्रिया पिंगळे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजपा, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपापले उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे बापू थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण आहेर, शिवसेना (शिंदे गट) मंगेश गुंडाळ, भाजपाचे शिवाजी मांदळे व एक अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील घटक पक्ष व महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होणार आहे.
