लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव “यू-व्हाईब्स २०२५” मोठ्या उत्साहात पार पडला. एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी, तळेगाव, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगली आणि चिचोंडी अशा नऊ कॅम्पसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून व सादरीकरणातून तरुणाईच्या ऊर्जेचा अद्भुत जल्लोष पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक, कवी व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे आणि एमआयटी एडीटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. अश्विनी पेठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संचालिका डॉ. ज्योती जोतवानी आणि सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना सुर्यकांत नामुगडे म्हणाले, “कलागुणांना वाव देणाऱ्या ‘यू-व्हाईब्स’ सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होते. कला आणि कल्पकतेचा हा सुंदर संगम विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवतो.”

दोन दिवस चाललेल्या ‘यू-व्हाईब्स २०२५’ मध्ये नृत्य, गायन, कला, क्रीडा आणि बिझनेस बडीज यांसारख्या अनोख्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी चित्रकला, रांगोळी, मेहंदी, फेस पेंटिंग, गायन, ग्रुप डान्स व टॅलेंट-शो अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कौशल्ये आणि व्यक्तिमत्वाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी क्रीडा स्पर्धेची सुरुवात एमआयटी एडीटी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांच्या हस्ते करण्यात आली. कब्बड्डी, लांब उडी, क्रिकेट, बुद्धिबळ, धावणे, पोहणे, गोळा फेक आणि थाळी फेक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यानंतर झालेल्या ‘बिझनेस बडीज’ या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक कल्पनांचे विपणन व आर्थिक नियोजनासह प्रभावी सादरीकरण केले. एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संचालिका डॉ. ज्योती जोतवानी म्हणाल्या ”यूव्हाईब्स हा फक्त एक स्पर्धात्मक उपक्रम नसून, तो प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. वेगवेगळ्या कॅम्पसचे विद्यार्थी एकत्र येऊन केवळ स्पर्धा करत नाहीत, तर परस्पर संवाद आणि मैत्रीची नवी नातीही निर्माण करतात.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या रिपल शर्मा व योगेश नागपाल यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *