राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) येथील पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर ते चाकण मार्गावर अपवाद वगळता सध्या दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे.
रविवारी (दि. १६) सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शनिवार, रविवारच्या सलग सुट्टीच्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सुटीच्या दिवशी पर्यटन अथवा इतर कार्यक्रमांसाठी एकाचवेळी अनेक वाहने महामार्गावर आल्यावर वाहतुक कोंडीची स्फोटक परिस्थिती निर्माण होते. मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या व परतणाऱ्या वाहनांसह दैनंदिन वाहतूक एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी उद्भवत असते. सध्या दररोज सायंकाळी ४ वाजल्यानंतर सुरू झालेली ही वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम असते. वाहने ३ ते ५ तास जागच्या जागी अडकून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. यात लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांचे मोठे हाल होतात.
या कोंडीचा वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम झाला असून रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राजगुरुनगर परिसरातील कोंडीत अनेकदा रुग्णवाहिका अडकल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे.
चाकणच्या तळेगाव चौक, आंबेठाण चौक आणि रोहकल फाटा वगळता महामार्गाच्या इतर महत्त्वाच्या ठिकाणीही वाहतूक पोलिस नियमनासाठी असणे आवश्यक आहे.
सलग सुट्ट्या अथवा सुटीच्या दिवशी राजगुरुनगर परिसरात वारंवार कोंडी होत असतानाही पोलिस यंत्रणा कोणत्याही पूर्वतयारीशिवाय निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या मोटारी, बस, ट्रक आणि दुचाकींची प्रचंड संख्या पाहता महामार्गावर एकच गोंधळ माजला जातो.
राजगुरुनगर शहरालगत बायपास रस्त्यालाही मोठी वाहतुक कोंडीची स्फोटक परिस्थिती निर्माण होत आहे.
