पुणे (हवेलीनामा वृतसमूह) विश्वशांती गुरुकुल या नामवंत विद्यालयात आयोजित दिवाळी मेळाव्यास विद्यार्थी, पालक व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “रामलीला” या नाट्यप्रयोगाने झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेले रामायणातील विविध प्रसंग पाहून उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी रामायण चोपाई गीतांचे सादरीकरण केले यावेळी संगीत शिक्षकांनी त्यांना साथसंगत केली. पारंपरिक वेशभूषा, अभिनय आणि विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरणात भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमाच्या मध्यांतरात मुख्याध्यापिका अरुणा अँथनी यांच्या हस्ते खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि गेम्स झोनचे उद्घाटन करण्यात आले. विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच मनोरंजनात्मक खेळांची स्टॉल्स पालक, मुले आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी आकर्षणाचा विषय ठरले. मेळाव्यात विद्यार्थ्यांचे पालक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. आनंद, उत्साह आणि ऐक्याच्या वातावरणात एमआयटी विश्वशांती गुरुकुल मध्ये हा मेळावा साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका अरुणा अँथनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
