थेऊर -( हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली यावेळी संचालक मंडळाने गोंधळाच्या वातावरणातच पटलावरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले.
         मागील काही दिवसांपासून यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्री संदर्भात शासनाकडून मिळालेल्या आदेशानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जमीन 299 कोटी रुपये विकत घेणार आहे यासंदर्भात सर्वत्र माहिती मिळाल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा विचार करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी याकडे निर्देश करत सर्व अटी शर्तींच्या धरतीवर ही जमीन विक्री प्रक्रिया पार पाडावी भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी या स्पष्ट केल्या होत्या त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे यशवंतच्या सभासदांचे लक्ष लागले होते.
           कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे पार पडलेल्या या 42 व्या सर्वसाधारण सभेची सुरुवात या सभेचे अध्यक्ष यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या मनोगताने झाली सुभाष जगताप यांनी गेली 13 14 वर्ष घडलेल्या सर्व घडामोडींचा पाढा वाचला यादरम्यान ज्यांनी ज्यांनी कारखान्याच्या भल्यासाठी कार्य केले त्या सर्वांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला विशेषतः कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांचे सहकारी यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतरच ही संचालक मंडळ आज कार्य करत आहे असे त्यांनी सांगितले कारखान्याच्या सभासदांच्या हितांच्या विचार करता आणि यशवंत पुन्हा गतवैभवास प्राप्त व्हावा यासाठी सर्व संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा प्रयत्न करून शासन दरबारी आपल्या भूमिका मांडून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून या निर्णयापर्यंत आपणास येता आले हे त्यांनी सांगितले. जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातील जवळपास 100 कोटी रुपये वाचवले असून ज्या बँकांची देणे आहेत त्यांना वन टाइम सेटलमेंट नुसार पैसे देण्यात आलेले आहेत त्यामुळे कारखान्याची सर्व जमीन आता मोकळी झाल्याचे त्यांनी सांगितले.
           अध्यक्षांच्या मनोगतनंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिका पटलावर मांडली त्यांनी एक एक विषय वाचून दाखवले आणि सभासदांकडे मंजुरीसाठी आवाहन केले.
            यादरम्यान सभासदांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी विषय पत्रिकेमधील मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे या अंतर्गत वाचन करण्यात आलेले काही विषय अधोरेखित केले जी सभा केवळ पाच ते दहा मिनिटात उरकण्यात आली त्या सभेचा इतिवृत्तांत वाचण्यासाठी आज 20 ते 25 मिनिटे लागतात यावरून हे विषय आम्हास मान्य नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले त्याचवेळी कारखान्याच्या मालकीची जी जमीन विकायची आहे ती अहवालात दिलेल्या गट क्रमांक आणि प्रत्यक्ष संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत दिलेल्या अंडरटेकिंग मधील गट क्रमांक तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी मोठा गोंधळ झाला त्यावर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी अहवालातील प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले यावर अनेक सभासद हसले.
           कृषी उत्पन्न बाजार समिती विकण्यात येणाऱ्या जमिनीचा दर परिसरातील सद्यस्थितीला अनुसरून नसल्याने कारखान्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे विकास लवांडे यांनी निदर्शनास आणून दिले तसेच संचालक मंडळ अनेक गोष्टी सभासदांपासून लपवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *