तळेगाव ढमढेरे: (हवेलीनामा ऑनलाइन) मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे जिल्ह्यात विविध कंपनीच्या मोबाईल टाँवर च्या बँटरी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक नियुक्ती केली.हे पथक शिक्रापूर परिसरात पहाटेच्या वेळी गस्त करीत असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,हा गुन्हा उदय बाळासाहेब काळे (रा. तळेगाव ढमढेरे) याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला आहे. त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उदय बाळासाहेब काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार प्रवीण रमेश मांढरे (वय 30 वर्षे, रा. शिक्रापूर) अक्षय अशोक शेलार (वय 26 वर्षे, रा. तळेगाव ढमढेरे),अक्षय बाळासाहेब वांभुरे (वय 28 वर्षे, रा. वाडा गावठाण ता. शिरूर) यांचे मदतीने केल्याची कबुली दिली आहे आहे.
सदर आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन परिसरात चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच त्यांनी एकुण ३० बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली असून चोरलेल्या बॅटऱ्या त्यांनी राजकुमार महादेव यादव (टिळेकर नगर सर्वे नंबर ५२ कोंढवा बुद्रुक) पुणे यास विकल्याचे सांगत असून गुन्हा करते वेळी त्यांनी राजकुमार यादव याचे अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन (एम एच-१२ एस एफ ८२०५) हे बँटरी चोरी करण्यासाठी वापरल्याची कबुली दिली आहे
गुन्हयात वापरलेला चारचाकी टेम्पो किं रु 5,00,000 चा जप्त करण्यात आला असून पाचही आरोपींना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा तपास पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा फौजदार तुषार पंदारे, पोहवा जनार्दन शेळके,पो.हवा. अजित भुजबळ,पो.हवा. राजू मोमीन,पो.हवा सचिन घाडगे,पो.ना. मंगेश थिगळे,पो. ना. योगेश नागरगोजे,मुकुंद कदम,पो शि अक्षय जावळे यांनी केला आहे.
