थेऊर: (हवेलीनामा वृत्तसेवा) कुंजीरवाडी गावातील धुमाळमळा येथे श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी केली. सर्वत्र भगवे झेंडे पताका लावून मंदीर परिसरात आकर्षक रांगोळी काढली व फुलांची सजावट केली होती महाराजांची कीर्ती सांगणाऱ्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झालेले होते. सकाळी किल्ले पुरंदर वरून ज्योत घेऊन श्रीनाथ तरुण मंडळाचे शिवभक्त मळ्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीचे औचित्य साधून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा भरविण्यात आल्या. सदर स्पर्धेसाठी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.. “मी पाहिलेला गड” आणि “माझ्या मनातील छत्रपती शिवाजी महाराज” या विषयांवर मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीतून विविध प्रकारची चित्रे रेखाटली. यावेळी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कलाशिक्षक दिपक शितोळे यांनी कामकाज पाहिले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.. शिवजयंतीच्या निमित्ताने शितोळे यांनी कार्यक्रमस्थळी काढलेल्या थ्री डी शिवप्रतिमेच्या रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले..
परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणाऱ्या अनेक विषयांची मांडणी मुलांनी अतिशय उत्तमपणे केली.. यावेळी परीक्षक म्हणून मुक्ताई स्कुलचे चेअरमन महेंद्र धुमाळ यांनी कामकाज पाहिले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
सायंकाळी ७ वाजता शिवप्रतिमेची मिरवणुक थेऊर फाटा येथून सुरु झाली.. अबालवृद्धांसह शेकडो शिवभक्त भगवे फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणूकीत सहभागी झाले होते.. धनश्री लॉन्सचे मालक प्रभाकर धुमाळ यांच्या धनश्री लाईट्स अँड इव्हेंट्सच्या वतीने शिवप्रतिमेला सुंदर सजावट करून आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती.. शिवप्रतिमेच्या पुढील बाजूस थेऊर येथील जयभवानी ढोल-ताशा पथक आपली कला सादर करत होते मिरवणुकीत श्री अश्विन मनगूतकर यांच्या सप्तरंग युद्धकला अकॅडमी तर्फे शिवकालीन मर्दानी खेळ असणाऱ्या लाठी-काठी तसेच दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.. प्रसिद्ध अश्वपालक अक्षय धुमाळ यांच्या “ब्रम्हा” या अश्वाच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत भरली.. यावेळी ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेल्या अनेक लहान मुलामुलींनी घोडेसवारीचा आनंद लुटला.. वाजत-गाजत मिरवणूक धुमाळमळा येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरापाशी संपल्यावर शिवप्रतिमेला औक्षण करुन माहेश्वरी विक्रम धुमाळ यांनी शिवआरती करण्यात आली यावेळी शिवरायांचा जयघोष करणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदूमला मिरवणूक संपल्यानंतर ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
