थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात हजारो भाविकांनी येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनाने केली त्यामुळेच पहाटेपासूनच येथील मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.
गेल्या तिन चार दिवसांपासून नाताळचा सण तसेच इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीस अनेकजण वेगवेगळ्या पर्यटन सहलीचे आयोजन करतात.निसर्गरम्य ठिकाणी काही दिवस घालवण्याचा आनंद घेतात.परंतू यावेळी महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणांना अनेकांनी भेटी देणे पसंत केले त्यामुळेच धार्मिक पर्यटन स्थळ ओसंडून वाहत आहेत.
थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र तसेच पुणे शहरालगत असल्याने एका दिवसाची सहल नियोजन करत हजारो भाविक सकाळपासून येथे गर्दी करत आहेत. भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर म्हातारीआई रस्त्यावर पोहोचल्या आहेत.गावात वाहनांची दाटी झाली आहे.ग्रामपंचायत कडून अतिरिक्त मनुष्यबळ वापरुन वाहने योग्य लावण्याची कसरत करत आहेत. मुख्य चौकात मात्र खुपच गर्दी झाल्याने रस्त्यावरुन चालणे अवघड होऊन बसले आहे.
शहर वाहतूक पोलीसांकडून काही सहकार्य मिळणे अपेक्षित असले तरीही ते आतापर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.आज थेऊर येथील आठवडे बाजार असल्याने या गर्दीत दुपारनंतर मोठी वाढ होणार आहे.
