पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन पालक मंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हवेली तहसील व पंचायत समितीने तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लोणी काळभोर व वाघोलीत करण्यात आले होते.
वाघोली येथील शिबिराचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रक्तदान केले या शिबिरात सुनील जाधवराव व रामकृष्ण सातव यांच्या विशेष सहकार्याने 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्त संकलन करण्यासाठी पुणे ब्लड बँक हडपसर यांचेही सहकार्य लाभले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे असे आव्हान आमदार पवार व जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले.
यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के तहसीलदार, तृप्ती कोलते अप्पर तहसीलदार विजयकुमार चौबे, रामदास दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, गवळी उपसरपंच महेंद्र भाडळे, तलाठी लाखे, महेश गायकवाड, स्वप्निल सातव, गणेश शिंदे वाघोलच्या आशा सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाची परिस्थिती नियंञणात आलेली असली तरीही हवामानातील बदलामुळे विविध सांसर्गिक रोगांचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याचे आढळते. याचाच एकभाग म्हणजे रक्त शिबीराचे आयोजन व रक्त संकलन करणे हा देखील आहे. याशिवाय लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी रक्तदान करीत प्रथम रक्तदाता होण्याचा मान मिळवत कार्यक्रमाची सुरवात केली. अशाप्रकारे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक अशा वरीष्ठ अधिकारी यांनी या शिबिरात रक्तदान केल्याने नागरीकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत होण्यास प्रेरणा मिळाली.
सदर रक्तदान शिबीराचे आयोजन तहसिलदार विजयकुमार चोबे, मंडळ अधिकारी गौरी तेलंग व अशोक शिंदे व तलाठी यांनी नियोजनबध्दरित्या केले.
