पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आपल्या मुलाला अटक करुन नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीसातील शिरुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी इसमावर लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,तक्रारदार यांचे मुलाविरुध्द शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचे मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना खाजगी इसम सुभाष मुंजाळ याच्याशी बोलण्यास सांगितले. त्याने साहेबांना देण्यासाठी म्हणून १०,०००/- (दहा हजार) रुपये लाच मागणी केली व त्यास पोलीस उपनिरीक्षक मांडगे यांनी दुजोरा देवून त्यांनी सुद्धा १०,०००/- (दहा हजार) रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत.
