पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष आपापल्या परीन कामाला लागले असले तरीही विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवार यांची धाकधूक वाढली आहे.आपणच किती तुल्यबळ आहोत ते दाखवून देण्याचा पुरेपूर अट्टाहास केला जातोय. गेल्या पाच वर्षांत आपण आपल्या मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील कोणत्या अडचणीं हलक्या केल्या याचा प्रत्येक आमदार म्हणून घेणाऱ्यांनी स्वतःत आत्मचिंतन करावे.
पुणे शहराचा विस्तार होत असताना पूर्व हवेलीतील नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे.रहिवासी झोन वाढत आहेत तर शिरूर हवेली मतदारसंघातील वाघोली सारखे मोठ्या लोकसंख्येचे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले गावच्या मुलभूत अडचणी किती प्रमाणात सोडविण्यात आल्या हा एक यक्ष प्रश्न आहे.नागरिकीकरण वाढल्याने पिण्याचे पाणी,गटार तसेच रस्ते यावर किती काम झाले याकडे लोकप्रतिनिधींकडून लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणार्या गोष्टीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा अपेक्षित आहे.
आजपर्यंत हवेली तालुक्यातून विधानसभेवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही केवळ पक्षश्रेष्ठी सांगतील त्यांचेच प्रामाणिकपणे काम करण्यात स्थानिक पदाधिकारी धन्यता मानून घेत आले.एकमेकांची ताकद कमी करण्यात विशेष प्रयत्न होत गेले.यावेळी हवेली तालुक्यातील काही पदाधिकारी आपला वेगळा ठसा जनमानसात उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. मतदारसंघात उमेदवार आपला असावा हिच भावना निर्माण झाली आहे त्यामुळेच पक्षापेक्षा आपलेपणा हा मुद्दा या निवडणुकीत अनुभवास आल्यास आश्चर्य वाटायला नको.
शिरूर हवेलीचे आजपर्यंत तीनही आमदार शिरूर तालुक्यातील,हवेलीकर कायम पक्षादेश पाळून इमानेइतबारे काम करत उमेदवार डोक्यावर घेऊन नाचले.परंतू निवडणूक प्रक्रियेनंतर सर्वसामान्यांना केवळ प्रतिक्षाच करावी लागते.त्यामुळेच हवेलीतील सर्वसामान्य मतदारांनी यावेळी वेगळा विचार केल्याचे दिसून येत आहे.
महायुतीला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेशाने तुल्यबळ उमेदवार मिळाला आहे.त्यामुळेच या मतदारसंघातील चित्र बदलून गेले आहे.
