थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र थेऊर येथील प्रगतशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांना, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून, जाहीर झालेला, “स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी  नायकवडी तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

हवेली तालुक्यातील हा पुरस्कार मिळविणारे विजय कुंजीर हे पहिले शेतकरी ठरले आहेत यामुळे हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. मुंबईतील वरळी येथील NCE क्रीडांगणात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात आज राज्यातील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार्थी विजय कुंजीर यांचे वडील एकनाथ कुंजीर हे देखील प्रगतशील शेतकरी आहेत. विजय कुंजीर यांनी उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलिहाऊस मधील ऑर्चिड, अँथोरियम, फिनोलॉपसिस या हायटेक फुलशेतीकडे वळत फुलांची झाडांची आयात निर्यात करून, जिल्ह्यात चांगला नावलौकिक मिळवला आहे. आज पुरस्कार मिळाल्यानंतर विजय कुंजीर व त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त होत असून थेऊर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना तालुका पंचायत समितीच्या शिफारसीने, पुणे जिल्हा परिषद कडून देखील विजय कुंजीर यांना २०२१ साली, “कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” देण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी विजय कुंजीर म्हणाले, शेतकरी भविष्यात हायटेक शेतीकडे वळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तीकडे वाटचाल होऊन, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, यासाठी पुढील काळात हायटेक शेती करणारे शेतकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे वेळी विजय कुंजीर यांचे कुटुंबिय, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, वैभव बडदे, प्रतीक कंद, आप्पासाहेब उंद्रे, विकास नागे, पृथ्वीराज काकडे, हर्षद शिंदे, प्रशांत शिंदे, संभाजी नायकवडे, वैभव लवांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *