अहमदाबाद (हवेलीनामा वृत्तसमुह) गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण अपघात झाला असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोटारमधील लोक श्यामला जी मंदिरात दर्शन करून अहमदाबादकडे परतत होते. त्यावेळी त्यांची मोटार मागून एका मालवाहू अवजड वाहनास धडकली. अपघाताची भीषणता एवढी होती की, मोटारीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. कटरने कापून मोटारीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकूण आठजण प्रवास करत होते. त्यातील केवळ एक जण बचावला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
अपघातग्रस्त मोटारीचे फोटो समोर आले असून ते भयानक आहेत. वाहनाचा वेग जास्त होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. ट्रकला मागून धडक दिल्यानंतर मोटारीचा चक्काचूर झाल्याने आत मृतदेह अडकून पडले. अग्निशमन विभागाने कटरने कापून मृतदेह बाहेर काढले.
