पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर(ता.हवेली) येथील यशवंत सहकारी कारखान्यात साहित्याची चोरी करताना तीन महिलांना सुरक्षारक्षकांनी सोमवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सुरेख भलभिम सरोदे (वय ५५), रेखा जगन पात्रे (वय ५०) व ज्योती विष्णु रोकडे (वय ३५ सर्व रा. वाघोली बाजाराजवळ, वाघोली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी कारखान्याचे सुरक्षारक्षक योगेश भगवान गायकवाड (वय ३६ रा. यशवंत सहकारी कारखाना कॉलनी, थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षक गायकवाड यांना दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या मोकळ्या जागेत तीन अनोळखी महिला त्यांच्या डोक्यावर भरलेले पोते घेऊन जात असलेले दिसल्या गायकवाड यांनी महिलांना हटकले, तेव्हा तिन्ही महिला पळून जाऊ लागल्या .त्यानंतर योगेश गायकवाड यांनी त्यांचे सुरक्षारक्षक मित्र रामराव कल्याणकर, संजय धनवडे व गोकुळ गायकवाड त्वरित बोलावून घेतले. सुरक्षा रक्षकांनी तिन्ही महिलांना अडविले घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी महिलांच्या पोत्यांची पाहणी केली असता, पोत्यामध्ये ८०० रुपये किंमतीचे अॅल्युमिनियमची हॅलोजन बॉडी, ६००रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची केबल, ५०० रुपये किंमतीची ताब्याची तुटलेली केबल व ५० रुपये किंमतीचे अक्सा ब्लेडपान असा एकूण एक हजार नऊशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी तिन्ही आरोपी महिलांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.
