पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) खेड भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टंकलेखक महिलेवर नऊ हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीचे खेड तालुक्यातील साबर्डी येथे गट नं. २४५ मध्ये एकुण ६३ गुंठे शेत जमीन असून, या गटाची मोजणी करण्याकरीता तक्रारदार यांचे पती यांनी दि. १/१/२०२४ राजी उपअधीक्षक भुमी अभिलेख, नगर भूमापक अधिकारी, ता. खेड, जि. पुणे यांच्याकडे अर्ज दिला होता. खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे ह्या सध्या नगर भूमापन अधिकारी खेड कार्यालयामध्ये खाजगी टायपिस्ट म्हणून काम करतात. खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांचेकडे हे काम करण्यासाठी प्रथम १२,०००/- रुपये व त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता आणखी २,०००/- रुपये लागतील असे सांगितल्यावर, तक्रारदार यांनी सदर रक्कम रोख स्वरुपात दिली. तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमीनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर खाजगी महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांना फोन करुन, लोकसेवकाने जमीन मोजणी करीता आणलेली मशिनचे आणखी ६,०००/- रुपये व जमीनीचे कागदपत्र तयार करणेकरीता ३,०००/- रुपये असे लोकसेवकाकरीता एकुण ९,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजासाठी लोकसेवकाकरीता तडजोडीअंती ७,०००/- रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये ७,०००/- (सात हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले, त्यांचेविरुद्ध खेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल भोसले तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
