पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) उच्च पदस्थ प्राध्यापकांकडून पी एच डी साठी प्रबंध सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पंचवीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली.शिक्षण क्षेत्रात विशेषतः उच्च शिक्षणातील प्राध्यापकांना शासनाकडून गलेलठ्ठ पगार असून देखील लाचखोर प्रवृत्ती उफाळून आल्याचे उदाहरण पुढे आले आहे.शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ख्याती असून देशविदेशातील विद्यार्थ्या शिक्षणासाठी येथे प्रवेश घेतात.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार हे प्राध्यापक असून, त्यांनी अर्थशास्त्र मध्ये Ph. D. डिग्री प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन प्रबंध सावित्रीबाई फुले विद्यापिठ, पुणे करीता तयार केलेला आहे. हा प्रबंध सावित्रीबाई फुले विद्यापिठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे मार्गदर्शक म्हणून लोकसेविका शकुंतला माने यांची सावित्रीबाई फुले विद्यापिठाकडून नियुक्ती झालेली आहे.
तक्रारदार यांनी सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करुन पुन्हा सादर करणे व त्यावर अप्रुव्हल देणे यासाठी लोकसेविका शकुंतला माने यांनी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती.या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेविका शकुंतला माने यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजसाठी २५,०००/- रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली व आज दि. ३०/०३/२०२४ रोजी लोकसेविका शकुंतला माने यानी तक्रारदार यांचेकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन रुपये २०,०००/- (वीस हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.