शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्यासाठी शिरूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात चार ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच नगरपरिषदेच्या गणेशमूर्ती संकलन रथ सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी अँड.प्रसाद बोरकर यांनी केले आहे.
शहरातील निर्माण प्लाझा समोरील जागा गुजरमळा,रयत शाळेचे मैदान,शनिमंदिर विसर्जन हौद व कुंभारआळी या घाटावर विसर्जनाची सोय केलेली आहे.शनिमंदिर येथे विसर्जन घाटावर नगरपरिषदेने शिरुर एन्व्हायरमेंट फोरम व वात्सल्य सिंधू फाऊंडेशन या संस्थांच्या मदतीने ज्या नागरिकांना मुर्ती दान करावयाची आहे त्यांच्यासाठी तेथे सोय केलेली आहे.नगरपरिषदेचा विसर्जन रथ आपल्या दारासमोर येणार आहे.ज्या गणेश भक्तांना विसर्जन रथामध्ये मुर्ती दान करावयाची आहे त्यांनी ती नगरपरिषदेकडे सुपूर्त करावी असे आवाहन शिरूर नगरपरिषदेच स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी टाळावी व शक्य झाल्यास घरीच श्रीगणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अँड.प्रसाद बोरकर यांनी केले आहे
