पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.उरूळीकांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव मूळ येथील इनामदारवस्ती जवळील गुरुदत्त नर्सरीजवळ मंगळवारी (ता. १२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंगेश गिताराम खेडेकर (वय ३५, व्यवसाय शेती, रा. खेडेकरमळा, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नितीन एकनाथ खेडेकर (वय ५२, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन खेडेकर हिरो होंडा फॅशन मोटरसायकल एम एच -१२पी के १७२२ वरुन पुणे सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन या ठिकाणी निघाले होते. या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने खेडेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघतात त्यांच्या डोक्याला, हाताला, मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहे.
