पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज “गुंडाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे.सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पुढील माहिती खाली कमेंट्स मधे केली आहे.
(साभार -श्री पेंडसे गुरूजी)
