पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गौरवशाली महाराराष्ट्रातील विविध धार्मिक रिती रिवाज व कुळधर्म याने संपन्न आहे सण उत्सव याची मोठी परंपरा आजतागायत चालू आहे असाच एक मांगल्याचा व सुख समृद्धी चा सण म्हणून ओळखला जातो तो गौरी गणपतीचा.गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट असले तरीही हा कुळधर्म कुळाचार प्रत्येक जण आपापल्या परीने पार पाडतो धनधान्य समृद्धी प्रदान करणाऱ्या या सणाचे मोठे महत्व आहे.

भाद्रपद शुक्ल सप्तमीस गौरीचे आगमण होते व अष्टमीस त्यांना महा नैवैद्य अर्पण करण्यात येतो या सनाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका प्रचलित आहेत.
“गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन’ हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे.गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.”
(साभार:- पेंडसे गुरूजी)
