पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यातील बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांपैकी चोवीस साखर कारखाने वेगवेगळ्या खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालू झालेले असून हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखाना हा असा एकमेव कारखाना असेल जो सभासदांनी स्वतःच्या मेहनतीवर चालू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.संचालक मंडळाच्या निवडीसाठी यशवंतच्या गंगाजळीत पैसे नसल्याने सभासदांनी निधी उभारुन ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला त्यानुसार राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सभासदांनी तीस लाख रुपयाचा निधी सुपूर्द केला.यावेळी शेतकरी सभासद मंडळात माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांचे सहकारी यांनी हा धनादेश साखर आयुक्त तसेच कारखान्याचे प्रशासक संजय गोंदे यांच्याकडे दिला.यावेळी साखर आयुक्त यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की,राज्यातील बंद पडलेल्या चोवीस साखर कारखान्यांपैकी काही शासनाने तर काही खाजगी बॅंकांनी भाडेपट्टीवर चालवण्यास दिले त्यामुळे सुमारे चोवीस हजार कामगारांना त्यांचा रोजगार मिळाला तसेच तीन लाख शेतकऱ्यांस आपला हक्काचा कारखाना चालू करता आला.परंतु हवेलीतील यशवंतचे एकमेव उदाहरण आहे की येथील सभासद स्वतः हा कारखाना चालू करत आहेत.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे सभासद भाऊसाहेब आव्हाळे,आण्णासाहेब काळभोर, रमेश कुंजीर, रमेश काळे,विठ्ठल काळे,मोरेश्वर काळे,मुंबई महापौर केसरी आबा काळे,सुखराज कुंजीर,साहेबराव बांगर,शिरीष दांगट,साहेबराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साखर संकुलातील पत्रकार परिषदेत माजी संचालक पांडुरंग काळे यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली,कारखान्यावर कर्ज नसताना ते लादल गेलय,बँका कर्जाबाबत माहिती देत नाहीत त्यामुळेच सभासदांना निश्चित माहिती नाही परंतु अलिकडेच घडलेल्या घडामोडीनंतर कारखाना सभासद चालू करतील असे ठरल्यानंतर शासनाकडून एक सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्यात संचालक मंडळ नियुक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी निधी संकलन करण्याचे ठरले.उपस्थित सभासदांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाईल सुज्ञ सभासद यावर योग्य निर्णय घेतील असेही काळे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *