पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोकशाही न्युज चॅनेलचे दौंड तालुका प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्यावर आज बातमी संदर्भात पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रासह जीवघेणा भ्याड हल्ला करण्यात आला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्व पत्रकार संघटनांकडून तिवृ निषेध करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी या निंदनीय घटनेनंतर अरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोकशाही संरचनेत पत्रकारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे यास लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे संबोधण्यात येते.समाजातील अपप्रवृत्ती समोर आणण्याचे काम या माध्यमातून होते.परंतु समाजातील गुंड प्रवृत्ती हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात यातून पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करण्यात येतो अशाच प्रकारचा प्रयत्न दौंड तालुक्यात घडला आहे.मागील निवडणुकी दरम्यान गावातील गोंधळाची बातमी दाखविल्याचा मनात राग धरून आज विनोद गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर दौंड तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र येऊन विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तालुक्याचे जेष्ठ पत्रकार आब्बास शेख यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांच्यावतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करुन तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
