पुणे(हवेलीनामाऑनलाइन) गणेशाच्या अनेक अवतारांपैकी मयुरेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला आहे.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. गाणपत्य संप्रदायातले हे एक व्रत आहे. खरं तर श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात.आत्ताच्या काळात काही कारणांमुळे ते दहा दिवसापुरते मर्यादित झाले आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारत वर्षात हा गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली, या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीबाप्पांचे स्वागत कसे करावे, कोणता देखावा उभारावा, कोणत्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोणत्या स्पर्धा घ्याव्यात, व्याख्यानाला कुणाला निमंत्रण द्यावे या विचारात दंग असतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात :-
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती.
आपण आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंत रोज वेगवेगळ्या प्रसिद्ध गणपतींची ऐतिहासिक व पौराणिक माहिती घेणार आहोत.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती हा मानाचा गणपती असेही म्हणतात . उजाड झालेल्या पूर्ण भागात कतारकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातून यवनांच्या छळास कंटाळून आलेली आठ कुटुंब या.ठिकाणी स्थिरावली . त्या काळात या भागाला पुनवडा अस म्हणत . त्यापैकी ठकार कुटुंबीयांतील एका गणेशभक्ताने गणेशखिंड भागातल्या पार्वतीनंदन गजाननासमोर अनुष्ठान आरंभले . त्याला तिथे दृष्टांत झाला की , मुठा नदीच्या किनारी एका शमी वृक्षाजवळ माझे स्थान आहे. त्याप्रमाणे शोध घेतला असता , ही मूर्ती नदीत सापडली . वरच्या भागातून ती वाहत आली असल्याचीही शक्यता होती . जवळच्या एका कोनाड्यात ही मूर्ती ठेवण्यात आली . ठकार कुटुंबीय पूजाविधी पाहू लागले . दरम्यान , पुणे भागातील उजाड भागाला वसविण्याचा निर्णय जिजामाता साहेबांनी घेतल्यानंतर त्यांना ह्या जुन्या स्थाना विषयी कळले.तो वर हा भाग कसबा नावाने ओळखला जाऊ लागला होता .( कसबा हा फारशी शब्द आहे . कसबा म्हणजे प्राचीन , पाकिस्तानातही कसबा नावाचा भाग आहे . ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांनी कसबा गणपतीचे मंदीर उभारले . जवळच लाल महालाचा परिसर असल्यामुळे या स्थानावर गणरायाच्या नित्य दर्शनास त्या येत असत . नव्याने वसतीला आलेल्या रयतेनेही या गणरायाला आपले ग्रामदैवत मानले . कोणत्याही शुभविधीची ‘ अक्षता ‘ त्याला देण्यात येते . पुणेकरांचा हा मानाचा गणपती. इ.स .१६३६ सालच्या दरम्यान राज माता जिजाबाईंनी समारंभपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना करवून भक्कम दगडी गाभारा बांधला . पुढील सभामंडप नंतरच्या काळात श्रीमंत पेशव्यांनी बांधला. मंदिर वर्णन = मंदिराची बैठक गणेश यंत्रावर केल्यासारखी वाटते . मंदिराचा गाभारा व दर्शनमंडप भक्कम दगडी आहे . दर्शनमंडप २०x२० फूट असून मजबूत असे चार दगडी खांब आहेत . उजव्या बाजूस दत्त महाराज , गणपती , शिव , विठ्ठल – ह्या दैवता आहेत . त्यांची स्थापना अलीकडची आहे .बाहेरच्या भागात डाव्या व उजव्या बाजूस दरवाजे आहेत . सभामंडप तीन दालनी आहे , मधले दालन मोठे आहे . मंदिराच्या प्रवेशद्वारापासून व मागे वाडा आहे . सभामंडपाबाहेर पण , गजाननाच्या समोरच हातात मोदक घेतलेला मूषक आहे . एकमजली वाड्याचे बांधकाम लाकडी असून काही खांब खिळखिळीत झालेत. जवळच एक मारुती मंदिर आहे .
मूर्ती वर्णन
मोठया तांब्याच्या आकाराजी ही मूर्ती दर बुधवार व शनिवारच्या शंभर ते सव्वाशे ग्रम शेंदूर लेपाने साडेतीन फूट उंच तर पाच फूट रुंदीची बनली आहे.आकार असा उरलेला नाही. मूर्तीला हिर्याचे दोन डोळे तर माणीक बेंबीत आहे. सदर लेख १२१ गणेश दर्शन ह्या ग्रंथात आलेला आहे.
(साभार एक गणेश भक्त)

