पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह ] राज्यात आज काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच, नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्ययासह राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
