आळंदी देवाची [हवेलीनामा वृत्तसमुह] आळंदी देवाची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णास घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने युवतीस वेळेत उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित तरुणी आंब्याच्या झाडावरून खाली पडली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका अडकली.
या घटनेत उज्ज्वला नामदेव झाडे (वय २१ वर्षे, रा. आळंदी देवाची) या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उज्ज्वला ही आळंदीत गायन शिकत होती.तर एका कंपनीत कामावर जात होती. आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी नलावडे यांनी रुग्णवाहिकेचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच आरोग्य सेवा यंत्रणा सुसज्ज ठेवत संबंधित कर्मचारी यांना सतर्क केले होते. मात्र, आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस स्टेशनच्या मधील नऊ मीटर रस्त्यावर असलेल्या भाजी विक्रेते आणि बेकायदेशीर दुचाकी पार्किंग, रहदारीच्या गर्दीने रुग्णवाहिकेस रुग्णालयाच्या बाहेरून आत पोहोचण्यास सुमारे 20 मिनिटे लागल्याचे चालकाने सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांनी यंत्रणा सज्ज ठेवून देखील रुग्ण वेळेवर तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. उपचारापूर्वी रुग्णाचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नलावडे यांनी सांगितले.
अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंग ही सर्वच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचा संवेदनशील विषय बनला आहे याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतो आहे.एखादी अनुचित घटना घडली तर यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
