पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यास नवल वाटायला नको असे विधान ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.परंतु भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संजय राऊत वेडे झाले आहेत. पवारांच्या हातात हात घालून शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतर देखील हा माणूस शांत बसण्यास तयार नाही. रोज वेगवेगळी विधान करणं, विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं, निवडणूक आयोगाला अर्वाच्च भाषेत बोलणं सुरु आहेच.”
संजय राऊत सांगलीत गेल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. यांची परिस्थिती म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी झाली आहे. हे एकमेकांना संभाळून घेत आहेत. राज्याचं राहिलं हे लोकं देशाची भाषा बोलत आहे. कृपामाई रुग्णालय खूप चांगलं आहे. तिथे राऊतांना दाखल करण्याची नितांत गरज आहे,” अस पडळकर म्हणाले.
