पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये सुमारे ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरतीची प्रक्रिया चालू असून सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तर 10 मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींना अर्ज करता येतील. अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे.जवळपास सात-आठ वर्षांनी पदभरती होत असल्याने अनेक उच्चशिक्षित देखील वर्ग- तीन व वर्ग-चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी रस्सीखेच होईल.

तालुका स्तरावरील बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. १५ दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे. त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करतील आणि त्यानंतर गुणवत्तेवर आधारित यादी प्रसिध्द होईल. शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
