पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] रास्ता पेठ महावितरण कार्यालयातील विधी सल्लागार व सहाय्यक विधी अधिकारी यांना 40 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार महावितरण कार्यालय रास्ता पेठ येथे विधी सल्लागार या पदावर कार्यरत असलेले सत्यजित विक्रम पवार आणि गणेश खिंड येथील कार्यालय सहाय्यक विधी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे समीर रामनाथ चव्हाण यांनी तक्रारदार यांना पाहिजे असलेल्या 12 वीज जोड मीटर साठी आलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी 40 हजार रुपयाची लाच मागणी केली होती, यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली यावर या विभागाकडून सापळा रचला आणि चाळीस हजार रुपयाची लाच घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
