पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] नदीने आपल्याला जीवन दिले परंतु आपण नदीला काय दिले याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले. नदी आणि पाण्याचे स्रोत संवर्धन व जतन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भविष्यात पाण्याची गरज ओळखून या विषयावर सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात “धारा 2023” ही नदी विषयावरील राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे या परिषदेचे उद्घाटन मंत्री शेखावत यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात नमामि गंगेचे महासंचालक जी अशोक कुमार, एम आय यु ए चे संचालक हितेश वैद्य, महापालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते

नदी आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित राहिले तर पुढील पिढीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चिंता व्यक्त करून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पाणी विषयावर काम करण्यास सरकारने सुरुवात केली आहे नमामि गंगे या प्रकल्पाची जगभरात कौतुक होत असून वाढती लोकसंख्या शहरीकरण औद्योगीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे भारत हा जगातील तिसरी महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना पाणी या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नये त्या दृष्टीने केंद्र सरकार काम करीत आहे हर घर जल, नदी सुधारणा, जल व्यवस्थापन, जलप्रक्रिया, भूजल पुनर्भरण भूजल व्यवस्थापन शुद्धीकरण सांडपाणी प्रक्रिया या संदर्भात मोठी गुंतवणूक सरकार करत आहे. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी कोणताही देश खर्च करीत नाही असे शेखावत म्हणाले.

जगाच्या तुलनेत 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे तर भारताच्या वाट्याला केवळ चार टक्के पाणी उपलब्ध आहे याकडे लक्ष वेधत असताना ते म्हणाले गेल्या वर्षी रिवर सिटी अलायन्स या संस्थेची सुरुवात झाली यात सुरुवातीला 27 शहरांचा समावेश होता आता यात 107 शहरांचा समावेश करण्यात आला आहे ही चांगली बाब असून केंद्र सरकार, राज्य सरकार या संदर्भात जे काही निर्णय घेत आहे योजना आणत आहे त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. याच वेळी पाणी या विषयावर काम करताना नागरिकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे नदी सुधार, नदी जोड प्रकल्पाचा समावेश यात करण्यात आला आहे जगात भूजल साठ्याचा सर्वात जास्त वापर हा भारतात केला जातो त्यामुळे भूजल पुनर्भरण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीची सध्याची परिस्थिती अतिशय भयंकर असून या नदीत प्रदूषणाची पातळी खूपच मोठी आहे या नदीच्या सुधार योजनेचे काम वेगात सुरू असून 2025 पूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रदूषित पाणी नदीत सोडले जाणार नाही राज्य सरकारकडून नदीजोड प्रकल्प आंतरराज्य नदी जोड प्रकल्पाचे प्रस्ताव सादर झाले आहेत त्यावर विचार केला जात आहे असे गजेंद्र शेखावत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *