पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] आपल्या 13 वर्षीय मुलीला जिवंत कालव्यात फेकून ठार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलीची हत्या करून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने कालव्यात 10 तास शोधमोहीम राबवली, मात्र मुलीचा मृतदेह सापडलेला नाही. तनुश्री संदीप शिंदे (१३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. मुलीला मित्र मंडळ चौकातील वीर सावरकर पुतळ्यामागील कालव्यात फेकण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर अग्निशमन दल आणि स्वारगेट पोलिस घटनास्थळी पोहोचले. तनुश्रीच्या आई-वडिलांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाद सुरू आहे. ते काही काळ वेगळे राहत होते. मुलीचे वडील रिक्षा चालवतात तर तिची आई ब्युटी पार्लर चालवते.आरोपीला दारूचे व्यसन आहे. आर्थिक विवंचना आणि चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालायचा. घरखर्चावरून वाद आणि चारित्र्यावर संशय यांमुळे तनुश्रीची आई महिनाभरापूर्वी घर सोडून बहिणीच्या घरी राहू लागली होती. तनुश्रीही तिच्या आईसोबत राहत होती, तर तिचे वडील धनकवडी येथे राहत होते. तो तनुश्रीला शनिवारी आणि रविवारी सोबत घेऊन जायचा. ती तिच्या वडिलांसोबत राहत होती. आठ दिवसांपूर्वी संदीपने पत्नीला घटस्फोटाची नोटीस पण पाठवली होती.संदीप गुरुवारी रात्री तनुश्रीला घेऊन आला. तो रिक्षाने धनकवडी येथील घरी गेला. यानंतर त्यांनी मुलीला सकाळी वीर सावरकर पुतळ्याच्या मागे असलेल्या कालव्यावर नेले. येथे त्याने मुलीला जिवंत कालव्यात फेकून ठार केले. त्यानंतर तो बाहेर आला. चौकात उभ्या केलेल्या त्याच्या रिक्षात बसून त्याने मित्राला फोन करून मुलीच्या हत्येची माहिती दिली. मित्राने पत्नीला माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. यानंतर घटनेची माहिती स्वारगेट पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली. दरम्यान,त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
