राजगुरूनगर (हवेेेलीनामा आँनलाइन) वडगाव पाटोळे (ता. खेड) येथे महिलेवर हल्ला करुन त्यांना ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वडगाव पाटोळे भागात मागील तीन महिन्यांपासून एका बिबट्याने दहशत माजवली हाेती. गुरुवारी (दि. ९) मध्यरात्री संबंधीत महिलेला ठार करणारा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. नरभक्षक बिबट्याला पकडल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वडगाव पाटोळे येथे दि.३१ ऑगस्ट रोजी साबळेवस्ती परिसरात जनाबाई वामन गडदे ही साठ वर्षाय महिला एका बिबट्याच्या हल्यात ठार झाली होती. वनविभागाने तेंव्हा पासून या परिसरात लक्ष ठेवले होते. या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्याने या परिसरात पिंजरे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या बिबट्याने शेळ्या, मेंढ्या ठार केल्या होत्या, तर दुचाकी स्वारांवरही हल्ला केला होता. अजूनही या परिसरात चार ते पाच बिबटे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
