पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शालेय जीवनापासून मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी आजोबांच्या याच नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बराच काळ घराबाहेर असतात. अशावेळी मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर येऊन पडते. याचमुळे मुलांच्या नाजूक मनावर योग्य संस्कारांची झालर लावण्याचे काम आजी आजोबांवर येऊन पडते. आजी आजोबांशी असलेल्या याच घट्ट नात्याची ओळख होणे पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. त्यामुळे शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ, गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे असल्याचेही जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रविवार १० सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाहीतर शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्र जारी केले आहे.
