पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत शहरातून वाहणारा मुठा उजवा कालवा रद्द करून २८ किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून पाणी वाहून नेण्यात येणार आहे यासंदर्भातील अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला समितीकडून अहवालाची तांत्रिक छाननी सुरू करण्यात आली असून, समितीकडून प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.
खडकवासला ते फुरसुंगी मुठा उजव्या कालव्याचे अंतर २८ कि.मी. आहे.यादरम्यान कालव्यातील पाण्याची चोरी, गळती, बाष्पीभवन होते.तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. त्यामुळेच धरणपासून फुरसुंगीपर्यंत भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी सध्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला होता. जलसंपदा विभागाकडून त्याची छाननी पूर्ण करून हा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या समितीने प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर राज्य शासनाची परवानगी घेऊन प्रत्यक्ष काम सुरू होईल.हे काम झाल्यानंतर यातून मोठी पाण्याची बचत होईल सुमारे अडीच अब्ज घनफूट म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणी गळती कमी झाल्याने शेतीला देखील अधिक पाणी उपलब्ध होईल. ७.८० मीटर रूंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा इंग्रजी-डी आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्यूसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत येईल.
