मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] माथाडी कामगारांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद राहणारआहेत तर पहाटे सुरू होणाऱ्या भाजीपाल्याचे मार्केट देखील कडकडीत बंद आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला त्याचबरोबर कडधान्याचा आज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.तुटवडा निर्माण झाल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माथाडी कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी तातडीने लक्ष दिले जावे,नाहीतर माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. संप, आंदोलने, बैठका झाल्या परंतु माथाडी कामगरांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
1) माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी.
2)सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी
3)विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे
4)विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे
5)माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे
6)विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करणे
7)माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे.
8)बाजार समितीच्या मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे.
9)सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवीमुंबई परिसरात तयार घरे मिळणे.
नवीन सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटूनही अद्याप माथाडी कामगारांच्या प्रश्नावर एकही बैठक झाली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा विधानभवनात माथाडी कामगाराचा मोर्चा धडकेल असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिला.
