परळी [हवेलीनामा वृत्तसमुह] आपला देश कृषिप्रधान देश आहे शेती हाच मुख्य व्यवसाय असून देखील शेती उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांस मोठी कसरत करावी लागते आहे कारण आपली जवळपास सर्वच शेती
पारंपारिक पध्दतीवर आधारलेली आहे.परंतु काही जण यात वेगवेगळे प्रयोग करून यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात.असाच एक उच्च शिक्षित तरुण शेतकरी ज्याची सध्या मराठवाडय़ात मोठी चर्चा होतेय.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी इथला हा बेरोजगार तरुण, आधुनिक शेतीची कास धरत त्याने चंदन शेती करण्यास सुरुवात केली.चंदनाचे उत्पादन निघण्यास अद्याप बराच कालावधी असला तरी अंतर पिकातून त्यांना मोठा आर्थिक नफा मिळत आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या शेतीचं परळी तालुक्यात कौतुक होत आहे. चंदनाच्या शेतीमधून तरुणाला पुढच्या वर्षी पाच कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्ञानेश्वर फड याने बीएससी आयटीआय शिक्षण घेतलं आहे. मात्र नोकरीच्या मागे न धावता त्याने वडिलोपार्जित शेतीच करण्याचा निश्चय केला. सात एकर शेतीतील एक एकर शेतीत त्याने चंदनाची लागवड केली आहे. लागवड करून दोन वर्षांचा अवधी झाला आहे. अद्याप याचे उत्पादन निघण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी आहे. परंतु ज्ञानेश्वरने याच चंदनात पेरूचे अंतरपीक घेतले आहे.
चंदनाची लागवड करणे सोपे असले, तरी त्याच रक्षण, निगा राखणे कठीण आहे कारण चंदनाला चांगली मागणी,बहुमोल असल्यानेच सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शेती सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आणण्याचा ज्ञानेश्वरचा प्रयत्न आहे. चंदनाच्या एका झाडापासून पंधरा किलो चंदन निघते, सध्या बेंगलोरच्या बाजारपेठेत आठ हजार रुपये प्रति किलो दर आहे. हाच दर कायम राहिल्यास ज्ञानेश्वरला सहा हजार किलो चंदनाचे उत्पादन अपेक्षित असून त्यातून किमान पाच कोटी रुपयांचे उत्पन्न निघण्याची शक्यता आहे अशी माहिती ज्ञानेश्वर फड या तरुण शेतकऱ्याने दिली.
