पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह ] भारतात खेळाला अधिक प्राधान्य दिले जात असून विश्वनाथ स्पोर्ट्स् मीट सारख्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू तयार होतील, जी महाराष्ट्राच आणि देशाच नाव जगात उंचावतील. खेळासाठीच्या पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या असतात, त्या मिळाल्या की, महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पटू घडतील. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम खेळाडू घडविण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करावी लागते तर जागतिक दर्जाचे खेळाडू घडतील. देश उभारणीत आणि युवक कल्याणासाठी खेळाडू नेहमीच अग्रेसर राहतील, असे प्रतिपादन, विश्वनाथ स्पोर्ट्स् मीट 2023 च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर याच्यातर्फे आयोजित 5 राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस् मीट 2023 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेती ऑलिम्पियन (बॉक्सिंग) लवलीना बोरगोहेन, भारतीय महिला मुष्टियुद्ध संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्करचंद्र भट, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. ज्योती कराड ढाकणे, वाराणशीचे रामकृष्ण त्रिपाठी, प्रा. एम. एन त्रिपाठी, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी, क्रिडा संचालक पद्माकर फड आदी उपस्थित होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले खेळाडू शिवम बोराडे, नेहा बधे, आर्या तुपे, ज्ञानेंद्र सिंग, प्रशांत शर्मा, देवांशी जगताप, हंसिका ओसावल, मृणाली पवार यांनी मशाल पेटवून उपस्थित सर्व खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने खेळण्याची शपथ दिली. फुटबॉल सामन्याची सुरुवात किशोर राजे निंबाळकर व लवलीना बोरगोहेन यांनी किक मारून सुरूवात केली. महाराष्ट्रातून चार हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यावेळी विविध महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या खेळाडूंनी मार्शपास केले. दरम्यान, विद्यापीठाचे राष्ट्रीय खेळाडू हर्षिता पाटील, नेहा बधे, आर्या तुपे, संदीप भापकर आणि सिद्धार्थ गर्ग यांचा सत्कार करण्यात आला.

एमआयटी एडीटी विद्यापीठामध्ये 150 हून अधिक विद्यार्थ्यांच्यासाठी स्थायिक क्रिडा अभ्यासक्रमासाठी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी स्पोर्ट्स अकॅडमीची सुरुवात करण्यात आली. यासाठी आंतर राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग मनोज पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचे कार्य होईल. केवळ नाममात्र दरात ग्रामिण आणि शहरी भागातील खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी भावना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली.
पाचव्या विश्वनाथ स्पोर्ट्स् मीट 2023 च्या उद्धाटनाच्या विविध खेळाच्या सामन्यांमध्ये मॉर्डन कॉलेज, एआयटी एसओई, व्हीआयआयटी कोंढवा, डीवाय पाटील पिंपरी पुणा कॉलेज आणि एमआयटी मॅनेट संघाची विजयी सलामी दिली. यात व्हॉलीबॉलमध्ये (पुरुष) मॉर्डन कॉलेजने व्हीआयआयटी कोंढवा संघाला दोन सेटमध्ये 2-0 असा पराभव केला. बास्केटबॉल पुरुष प्रकारात मॉर्डन कॉलेजने एमआयटी एसबीएसआर संघाला 55-43 अशा गुण फरकाने पराजित केले. तसेच एमआयटी एसओई संघाने जी. एस रायसोनी संघाला 50-25 असा पराभव केला. फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात पुणा कॉलेजने 5-0 गोल करत एनआयसीएमएआर संघावर एकहाती विजय मिळवला. डीवाय पाटील पिंपरी संघाने जीएच रायसोनी संघाचा 3-0 असा धुवा उडवला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या व्हीआयआयटी कोंढवाने एमआयटी एसबीएसआर संघाचा 2-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत धडक मारली. दरम्यान, एमआयटी मॅनेट लोणी संघाने 3-1 एनबीएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग संघाला पारभूत केले. तर एमआयटी एओई आळंदी संघाने काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग संघाला 2-0 गोल फरकाने पराभूत करून पुढच्या फेरीत दाखल झाले.
यावेळी लवलीना बोरगोहेन म्हणाली, बघितलेली स्वप्न आज पूर्ण झाले आहे. खेळ मनापासून खेळा आणि जिंका. देशात खेळासाठीचे वातावरण तयार होत आहे. माझ्या खेळाच्या कार्यात अनेक अडचणी आल्या मात्र मी खचले नाही, खेळत राहिले. जीवनात अनेक अडचणी येतील मात्र त्याकडे संधी म्हणून बघितले तर यश मिळाले. सकारात्मक विचार हाच यशाचा मंत्र आहे.
कोच भास्कर चंद्र भट म्हणाले की, खेळाडूंना चांगल्या सुविधा नाही दिल्या तर आपण आतंरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करू शकत नाही. त्यामुळे सुविधा असल्यास खेळाडू तयार होतील. एमआयटीमध्ये सुरू होत असलेल्या स्पोर्ट अकॅडमीतून अनेक जागतिक पातळीवरील खेळाडू घडतील.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, खेळाद्वारे देश उभारणीसाठी आमचे कार्य सुरू आहे. खेळासाठी शिस्त आणि चारित्र हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण करण्याचे कार्य एमआयटीतर्फे केले जात आहे. आजचा तरूण हा वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे. सर्वांगिण विकासासाठी विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही. लवलीना बोरगोहेन यासारखी अनेक खेळाडू देशातून आणि महाराष्ट्रातून निर्माण व्हावी. खेळाची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे प्रयत्न केले जात आहे.
प्रा. स्नेहा वा, प्रा. अशोक घुगे, प्रा. स्वप्नील शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र पुजेरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पद्माकर फड यांनी आभार मानले.
