नवी दिल्ली [हवेलीनामा वृत्तसमुह] जर एखादा कर्मचारी कामात कुचराई करत असेल, अनियमिततेचा कामाचा ठपका त्याच्यावर ठेवला असेल तर अशा कामगाराची खातेनिहाय चौकशी आणि इतर कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण होईल. पण निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटी देखील रद्द करण्यात येईल.अशी अधिसूचना काढण्यात आली आहे, सध्या हा नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असून लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी तो लागू होईल.
केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा, नियम 2021 बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यातील नियमात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. नियम 8 मध्ये हा बदल करण्यात आला असून त्यानुसार, केंद्रीय कर्मचारी नोकरी काळात कोणत्याही गंभीर गुन्ह्यात, अनियमितता, लाच, हलगर्जीपणा यामध्ये दोषी आढळल्यास त्याला निवृत्तीनंतर मिळणारे अनुषांगिक लाभ मिळणार नाहीत.
केंद्र सरकारने या बदललेल्या नियमांची माहिती सर्व केंद्रीय विभाग, खात्यांना पाठवली आहे, दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने या नवीन नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयीन प्रमुखाने अशा कर्मचाऱ्याच्या पेन्शन आणि ग्रॅज्युएटीवर रोख लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि याची सक्तीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आहेत.
या नियमानुसार, नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याविरोधात कोणतीही विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी, प्रक्रिया सुरु असेल तर त्यासंबंधीची माहिती द्यावी लागेल. यामध्ये कर्मचारी दोषी आढळल्यास त्याचे निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटी देण्यात येणार नाही.तसेच सेवानिवृत्तीनंतर एखाद्या कर्मचाऱ्याला पुन्हा तात्पुरत्या कामावर घेतले तरी यासंबंधीचा नियम कायम असतील. एखाद्या कर्मचाऱ्याला पेन्शन आणि ग्रॅज्युएटी देण्यात आली आणि तो दोषी आढळल्यास त्याच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात येईल.
त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडता येणार आहे. त्याचे म्हणणे ऐकूनच पुढचा निर्णय घेण्यात येईल. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाची सूचना आणि आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.ज्या कर्मचाऱ्याची पेन्शनची किमान मासिक रक्कम 9000 रुपये असेल अशांवरच नियम 44 नुसार कार्यवाही होऊ शकते.एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार हात सैल सोडत असताना कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उचलण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील काळात कर्मचाऱ्यांनी कामात चोख राहणे आवश्यक असेल. नाहीतर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधांवर पाणी सोडावे लागेल.
