सांगली [हवेलीनामा वृत्तस मुह] आशिया खंडातील सर्वात मोठी ‘सेक्सेल सिमेन’ प्रयोगशाळा चितळे समूह आणि बोवाइन जेनेटीक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी (जि.सांगली) येथे उभी राहिली आहे. आज या प्रयोगशाळेच्या उद्धाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

दूग्ध व्यवसायात प्रत्यक्ष काम करण्यासाठी आधुनिकतेची कास धरून जगामध्ये जे बदल होत आहेत त्याची नोंद घेऊन पावले टाकण्याचे काम येथे होते याची प्रचिती आली. आज जी नवीन प्रयोगशाळा काढली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामधून तयार झालेल्या उत्पादनांचा वापर देशामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकला तर दुधाचे अर्थशास्त्र बदलल्याशिवाय राहणार नाही,असे पवार यांनी सांगितले.

भारतात जगातील सर्वात जास्त दुभती जनावरं आहेत.परंतु सर्वात कमी दूध असणारा जगातील देश देखील भारतच आहे. आपल्याकडे दूग्धव्यवसायासाठी ब्रीड नाही, आहे त्या ब्रीड सुधारण्यासाठी त्याची गुणवत्ता वाढली पाहिजे. चितळेंच्या वतीने दुधाच्या क्षेत्रात चांगले काम होतेय. एक महिन्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीच्या सेवांची आवश्यकता आहे त्याची उलब्धता होईल व याचा दुधाच्या व्यवसायावर निश्चितच चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत हा देश अन्नधान्याच्या बाबतीत आज चांगल्या स्थितीला पोहचला आहे. पण खाद्य तेलाच्या बाबतीत अजून समाधानकारक प्रगती झालेली नाही. यासाठी आपल्याला ब्राझील, अमेरिकेवरून खाद्यतेल आयात करावे लागते. ते प्रामुख्याने सोयाबिनपासून तयार केलेले असते.ब्राझील, अमेरिकेमध्ये जे सोयाबीन आहे ते जेनेटिक मॉडिफाइड (जीएम) केलेले आहे. आज आपल्या देशात जीएमचा वापर करण्यास परवानगी नाही. जीएम ने उत्पादन घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याने केंद्र सरकारलाही मर्यादा आली.या संदर्भात दिल्लीमध्ये चर्चा करण्याची आमची तयारी आहे. केंद्र सरकारच्या वतीने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन हा नियम बदलून घेता आला तर त्यासाठी प्रयत्न करू. एक चांगलं बियाणं शेतकऱ्यांना दिलं तर उत्पादन वाढीसाठी आपण कधीही मागे पडणार नाही.

यासंबंधीचे काम या देशातील शेतकरी करू शकतो. २००४ मध्ये कृषी खात्याची जबाबदारी घेतली. त्यावेळी माझ्यासमोर पहिली फाईल आली त्यात असे लिहिले होते की आपल्याकडे तांदूळ आणि गव्हाचा साठा फार दिवस टिकणार नाही. तीन महिन्याचा साठा आहे. त्यामुळे परदेशातून हे धान्य आयात करावे लागेल.

मी फार अस्वस्थ झालो. पहिल्याच दिवशी परदेशातून अन्न आयात करावं लागण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी त्यावर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा फोन आला तेव्हा त्यांनी याबद्दल विचारले.तीन महिन्यानंतर धान्य शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होती म्हणून नाईलाजाने त्या फाईलवर सही केली व धान्य आयात केले. त्यानंतर धोरणं बदलली. काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने हे आव्हान स्वीकारले.आणि २०१४ ला शेती खात्याची जबाबदारी सोडली तेव्हा गव्हाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश होता. तर भात व फळ उत्पादनात जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता.व साखरेच्या उत्पादनात दोन नंबर देश झाला.

शेतकऱ्यांचे कष्ट, आमच्या सरकारची धोरणे, नवीन बियाणे, आधुनिकता व संशोधनामुळे हे शक्य झाले. नेमका हाच दृष्टीकोन दुधाच्या क्षेत्रामध्ये चितळे कुटुंबियांनी घेतला आहे. माझी पूर्ण खात्री आहे की, दुधाची जी स्थिती आहे त्यात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही.चितळेंचा हा नवीन प्रयोग सबंध शेतीला व शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो,असे त्यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *