पुणे (हावेलीनामा ऑनलाईन) राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सागर गोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे नेते संजय राऊत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना नेते खासदार राऊत यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर – हवेली या भागातील कार्यकर्त्यांचा मेळावा आळेफाटा येथे आयोजित केला होता. या मेळाव्यात अनेक जणांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. यामध्ये रासपचे सागर गोरे यांनीही प्रवेश घेत आपल्या हाती शिवबंधन बांधले. सागर गोरे यांच्या प्रवेशामुळे हवेली तालुक्यातील आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील धनगर समाज व समाजातील अनेक तरुण त्यांच्या सोबत असल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची ताकत वाढली आहे.
