पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी हा स्टार्ट – अप दिवस साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला. देशातील युवकांमध्ये संशोधानात्मक वृत्तीची वाढ व्हावी आणि अधिकाधिक उद्योग निर्माण व्हावेत हा यामागचा उद्देश आहे. युवकांनी याच्या माध्यमातून नोकरी देणारे उद्योजक बनावे. संशोधनात्मक वातावरणाशिवाय स्टार्ट-अप आणि इन्क्युबिटी तयार होणार नाही. आधिकाधिक संशोधक तयार झाल्यास भारत जगात आर्थिक महासत्ता बनेल, असे मत अटल इनोव्हेशन मिशनचे माजी संचालक रामनन रामनाथन यांनी व्यक्त केले.
       एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, अटल इनक्युबेशन सेंटर आणि अटल इनोव्हेशन मिशन,नीती आयोग, भारत सरकार द्वारे आयोजित स्टार्ट-अप डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीनानाथ खोलकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड, एआयसी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संचालक डॉ. मोहित दुबे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
        रामनन रामनाथन म्हणाले, स्टार्टअप ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. देशात नावीन्यपूर्णतेचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत. इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम विद्यापीठातून व्हावे. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये योगदान देऊ शकतात. देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्यासाठी उद्योगांच्या क्षमता महत्वाच्या आहेत.
        डॉ. मोहित दुबे म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ ही इनोव्हेशन ड्रिव्हन विद्यापीठ आहे. येथे संशोधन आणि उद्योजकता विषयक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांमधून उद्याचा उद्योजक आणि संशोधक घडविण्याचे कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्म वृत्ती तयार करण्यासाठी कार्य करत आहे.
दरम्यान, दीनानाथ खोलकर, डॉ. अनंत चक्रदेव यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रेखा सुगंधी यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *